सन १९०१ सालच्या मित्रमेळाचा गणेशोत्सव फारच मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तात्यारावांचे सहकारी त्रिंबक, वामन आणि शंकर या तरुणांनी याकरिता मेहनत घेतली. मित्रमेळ्यात येणाऱ्या तरुणांची कर्तृत्वशक्ती आणि वक्तृत्वशक्ती वाढत होती. गोविंद कवींनी गणेशोत्सवासाठी स्वतंत्र पदे रचली. या गोविंदकवींनी राम रावणाचे अत्यंत तेजस्वी संवाद आपल्या काव्यात गुंफले. ते ऐकत असताना हजारो प्रेक्षकांचे बाहू थरारून जात. रावणाचे भारतवर्षाच्या मूर्तिमंत लक्ष्मीस अपहरणारे उद्दामपण आणि रामाने त्याच्या दहा शिरांचा शिरच्छेद करून उगवलेला सूड यांची वर्णने अशा भाषेत जुळवली जात की, ऐकताच ती सीतालक्ष्मी म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मी हे सांगितल्याशिवाय समजावे. कोण राम, कोण रावण, सशस्त्र युद्धात शिरच्छेद झाल्यावाचून कोण शुद्धीवर येणार नाही ते मनामनात जाणून त्याने चित्तवृत्ती भडकाव्यात.
मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठकीत जे विषय तात्याराव मांडत त्याच विषयांवर आणि विचारांवर गोविंदकवी मोठ्या कुशलतेने सुंदर व तेजस्वी पदे रचित. ती पदे जितकी मार्मिक आणि प्रभावशाली असत तितकीच परिणामकारी अभिनय करून ती मोहक सुरात म्हणणारी मुलेही तयार झाली. ती मुले ती पदे नुसती पाठ करून म्हणणारी नसत, तर त्यांच्या मनात देखील तशीच तळमळ निर्माण झालेली असे. कवी इतकेच प्रभावीपणे ही मुले ही पदे सदर करत. दुःख, तेज, उत्कटता, करुण, क्रोध प्रत्यक्ष त्या मुलांच्या मनातून अभिनयात उतरे. सुरुवातीस ही केवळ तीन चार मुलेच होती. त्यात तात्यारावांचा धाकटा भाऊ बाळ, केतकरांचा दत्तू, जोशींचा बापू आणि वर्तकांचा श्रीधर असे.
पुढे पुढे तात्यारावांनी लिहिलेला सिंहगडचा पोवाडा, बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा, गोविंदकवींनी लिहिलेला अफजलखानच्या वधाचा पोवाडा आणि इतर अनेक पदे आणि संवाद बसवून या मुलांनी महाराष्ट्रभर सादर केला. पुढच्या पाच सात वर्षात महाराष्ट्रातील सहस्त्रावधी लोक, नगरेच्या नगरे ह्या ‘अभिनव भारताच्या’ या तेजस्वी कुमारांच्या तोंडच्या ह्या प्रभावी पदांवर लुब्ध होऊन गेलेली होती. सहस्त्रावधी लोकांच्या हृदयात देशभक्ती आणि राष्ट्रस्वातंत्र्याची ज्योत ह्या मुलांची ही पदे ऐकताच पेटवी. बाहूंत आवेश निर्माण व्हावा.
आता नाशिकच्या प्रौढ आणि पुढारी वर्गातही मित्रमेळ्याच्या कार्यक्रमांची चर्चा होऊ लागली होती. त्यातील अनेकजण मित्रमेळाचे सभासद होत होते. संस्थेच्या उद्देशानुसार नाशिकच्या बहुतेक राजकीय चळवळी मित्रमेळ्याच्या हातात आलेल्या होत्या. सार्वजनिक सभा मित्रमेळ्याच्या पुढाऱ्यांच्या सहकाऱ्यांनेच झाली तर बहुदा यशस्वी होई. आणि मित्रमेळ्याचे सहकार्य इंग्रजांच्या हांजीखोर उद्देशास आणि ठरवांस मिळणे शक्य नसल्याने नाशिकची राजकीय भाषा, सार्वजनिक ठराव सभांतून पुण्यापेक्षाही कडक आणि ठसठसीत झाली होती.
--*--
(c) आदित्य अनिल रुईकर Advocate