*भाग ४१ ते ४५*
*बखर_सावरकरांची:* भाग ४१ (१०/०७/२०२२)
दोन महिने उलटून गेले तरी नाशिक मधून प्लेग हटेना. त्यामुळे तात्यारावांच्या मामाने या सगळ्या मुलांना नाशिक सोडून कोठूरला आजोळी यावे म्हणून तगादा लावला. बाबारावांनी शेवटी तात्याराव, बाळ आणि पत्नीस कोठूरला पाठवून दिले. स्वतः मात्र नाशिक सोडून आले नाहीत. कोठूरला पोहोचल्यावर यांना लगेच गावात प्रवेश मिळाला नाही. त्यांना आधी पंधरा दिवस गावाबाहेर अण्णाराव बर्वेंच्या बागेत राहावे लागले. प्लेगचा थैमान सुरु असलेल्या भागातून जर कोणी आला तर त्यास आधी पंधरा दिवस गावाबाहेर राहावे लागे. येणाऱ्या व्यक्तींना प्लेगचा प्रादुर्भाव झाला नाही अशी खात्री झाल्यावर त्यांना गावात घेतले जाई. सकाळ संध्याकाळ मामा या मुलांसाठी डबे घेऊन येत. त्यांची काळजी घेत. पंधरा दिवस झाल्यावर मग ही पोर मामाच्या घरी राहायला आली. तात्यारावांच्या मामाचे या गावात चांगले प्रस्थ असे. कुस्ती खेळण्यात तो पटाईत असे. त्याची स्वतःची तालीम देखील असे.
अशा मामाचे भाच्चे म्हणून तात्यारावांशी गावकऱ्यांचा आपसूकच स्नेह जडला. त्यात तात्यारावांचे विचार ऐकून तर कोणीही त्यांच्याकडे आकर्षित होईच. त्यांच्या विचारांचा भक्त होई. मोठाली मंडळी देखील तात्यारावांचे बोलणे ऐकताना अक्षरशः मोहून जात. त्यांचे विचारच असे परिपक्व असत की, ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर कायमची छाप पाडून जात. तात्याराव ज्यांच्या घरी जात ते लोक आग्रहाने तात्यारावांना चापेकरांचा पोवाडा म्हणून दाखवण्यास सांगत. ते लोक पोवाडा तन्मय होऊन ऐकत आणि त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटत असे.
थोड्याच दिवसात तात्यारावांच्या भोवती कोठुरात अनेक मित्र जमले. गोदा नदीच्या काठावर ही सगळी मुले जमा होत आणि मित्रमेळ्यासारख्या बैठका भरवत. त्या बैठकांमध्ये तात्याराव आपल्या ओजस्वी विचारांनी देशास स्वातंत्र्य मिळणे कसे आवश्यक आहे, ते मिळवण्यासाठी कशी सशस्त्र क्रांती केली पाहिजे, हे समजावून सांगत. नाशिकला असते तर जे काम मित्रमेळासाठी तात्यारावांनी केले असते, ते ते सगळ काम कोठूरला आल्यावर तात्यारावांनी आरंभिले.
कोठुरमधील गावकऱ्यांनी तात्यारावांची एक सभा त्या गावात आयोजित केली. त्या सभेत तात्यारावांना ऐकायला अवघा गाव लोटला. सतरा अठरा वर्षांचा पोर एका ध्येयाने झपाटून त्याचा प्रचार करतो आहे, याचेच सर्वांना खूप नवल वाटे. सार्वजनिक भाषणात मांडलेले मुद्दे ऐकून तर गावकरी त्यांचा अधिकच गौरव करू लागले.
लोकमान्य टिळकांच्या चळवळीने स्वदेश विषयक जागृती आणि सदिच्छा गावोगावी उत्पन्न झाली होती. अशा स्थितीत तात्यारावांच्या या भावनोत्कट आणि स्पष्ट प्रचाराने तरुण मंडळीतच नव्हे तर अनेक प्रौढ मंडळीतही उत्साह संचारे. त्यांनी यापूर्वी असा भव्य, दिव्य आणि स्पष्ट विचार कधीही ऐकला नव्हता. तात्यारावांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी हा विचार ऐकून त्यांच्या मनात देशभक्तीची तळमळ जिवंत झाली. गावकऱ्यातील अनेकांना आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली.
तात्यारावांना हेच हवे होते. त्यांनी नाशिक सारखा कोठूरलाही मित्रमेळा सुरु केला. तरुण लोक त्यात अधिक संख्येने सामील होऊ लागले. मित्रमेळ्या सोबतच तात्यारावांनी खास विश्वासातील तरुणांना एकत्र करून गुप्त संघटन देखील सुरु केले. या संघटनेत सहभागी होणाऱ्या मंडळींना देशस्वातंत्र्यार्थ प्रसंगी सशस्त्र युद्धासही तोंड देऊन प्राणत्यागही करीन अशी शपथ दिली. त्यावेळी जमलेल्या मंडळींनी अशा शपथ घेतल्या आणि देश स्वातंत्र्यासाठी लढण्यास सिद्ध झाले.
इकडे कोठूरला तात्याराव हे कार्य करत असतांना त्यांच्या चित्तात मात्र नाशिकला असलेल्या आपल्या थोरल्या बंधूंची काळजी लागली असे. प्लेगच्या थैमानात राहणाऱ्या आपल्या भावाला पुन्हा प्लेग होणार तर नाही ना अशी सारखी काळजी लागून राहिलेली असे. आणि नकोशी वाटणारी ती बातमी एक दिवस कोठूरला येऊन धडकली. बाबाराव अचानक कोठूरला येऊन गावाबाहेर उतरले आहेत, असे तात्यारावांना कळले. अधिक चौकशी केल्यावर तात्यारावांना समजले की, नाशिकास असताना बाबारावांना पुन्हा प्लेग झाला आणि त्यांच्या जांघेत दोन गाठी आल्या आहेत. वायूचा त्रास देखील होऊ लागला. अंगात प्रचंड ताप भरला. हा त्रास सुरु असताना त्यांनी ही बातमी सगळे चिंतेत पडतील म्हणून कोठूरला कळवली नाही. पण थोडा उतार पडल्यावर ते लगेच कोठूरला तशा स्थितीत निघून आले. त्यांना काही शाश्वती वाटत नसल्याने बाळला आणि तात्यारावांना भेटण्यासाठी ते तातडीने आले. पण प्लेग झाल्यामुळे त्यांना गावात प्रवेश मिळाला नाही. ते बाहेरच उतरले. मग तात्याराव, बाळ आणि बाबारावांच्या पत्नी जाऊन त्यांना लांबून पाहू शकले. भेटता आलेच नाही. ते तसेच परत नाशिकास निघून गेले. पुढे तात्याराव या आठवणींबद्दल सांगताना म्हणाले की, “वासरापासून हिसडून चाललेली गाय जशी मागे मागे पाहत पुढे ओढली जाते. तसे बाबा आम्हा दोघा लहान मुलांकडे वळून वळून पाहत तसेच लंगडत लंगडत परत नाशिकला गेले.” त्यांनतर महिनाभराने नाशिकचा प्लेग ओसरला आणि मग तात्याराव आणि बाकीची मंडळी पुन्हा नाशिकास आली.
*(c) आदित्य अनिल रुईकर Advocate*
*बखर_सावरकरांची:* भाग ४२ (११/०७/२०२२)
नाशिकला येऊन मित्रमेळा आणि गुप्त संघटनेची स्थापना करण्यापूर्वीच तात्याराव भगूरला असताना तिथे बाल वयातील त्यांच्या मित्रमंडळींमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची तीव्र इच्छा आणि ते मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांती शिवाय कोणताही अन्य पर्याय नाही, अशा आशयाचे विचार त्यांनी निर्माण केले होतेच. आणि अशी सशस्त्र क्रांती झाल्यास आपल्यापुरती प्रत्येक भारतीयाने त्यात सहभाग घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे विचार तिथल्या मित्र मंडळीत पुरते रुजवले होते. नाशिकला हे भगूरचे मित्र पुढे कधी कधी येत तेव्हाही तात्याराव त्यांना मित्रमेळा आणि गुप्त संस्थेबाबत सांगत.
तात्याराव मधे एकदा भगुरास काही कामानिमित्य गेले असता तेथील मित्र मंडळींनी एकत्र येऊन मित्रमेळ्याची शाखा भगुरास स्थापन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे शाखा स्थापन करण्यात आली. त्यांच्या दर आठवड्याला बैठका होऊ लागल्या. जोवर तात्याराव भगुरास होते, तोवर ते या बैठकींना उपस्थित असायचे. त्यांचे विचार ते या नव्या सभासदांना सांगायचे. तात्याराव सांगायचे की, ‘इतर राष्ट्रांनी कसे स्वातंत्र्य प्राप्त केले, याचा अभ्यास करा. तो विषय सर्वांपुढे मांडा.’
भगूरच्या सभासदांना तात्यारावांनी एक काम दिले ते म्हणजे आजूबाजूच्या गावातून देशविषयक सर्व चळवळीचा प्रचार करावा. इंग्रजी सत्तेचा- परसत्तेचा तीव्र तिटकारा आणि स्वातंत्र्याची तीव्र लालसा शेतकऱ्यांच्यात उत्पन्न करावी. त्यास संघटनेची शपथ देऊन संघटनेच्या शाखा पुढे पसरवाव्यात. शेतकरी, शिपाई आणि पोलीस यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करावा आणि योग्य वेळ आल्यावर सर्वांनी एकाच वेळी उठावणी करावी. अशा आशयाची भाषणे देण्यास त्यांनी भगूरच्या सभासदांना तयार केले.
तेव्हापासून ही भगूरची शाखा नाशिकच्या शाखेप्रमाणेच सर्व सार्वजनिक उलाढाली आपापल्या कक्षेत नियमितपणे करीत असत. गावकरी, शेतकरी लोकांना स्वातंत्र्यार्थ शपथ देणे, शिवोत्सव, गणेशोत्सव, स्वदेशी इत्यादी उघड चळवळी गावोगावी पसरवण्याचे काम ही भगूरची मंडळी करू लागली. तात्याराव या सभासदांना सांगत की,
*“एकंदरीत इंग्रजी सत्ता म्हणजे रामराज्य, राजा म्हणेल ते खरे इत्यादी तोवर खेड्यापाड्यात पसरलेल्या दास्यप्रवण समजुतीस नामशेष करून त्या परसत्तेविषयी तीव्र द्वेष पसरवून स्वराज्याविषयी, देश स्वातंत्र्याविषयी उत्कट लालसा आणि सहानभूती उत्पन्न करणे. इंग्रज म्हणजे मायबाप सरकार हे पूर्वीचे पालुपद जाऊन इंग्रज म्हणजे चोर ही भावना शेतकऱ्यांपर्यंत उत्पन्न करण्याचे कार्य अशा खेडोखेडीच्या लहान लहान गुप्त संघटनांनी उत्कृष्टपणे साधे.”*
तो काळ असा होता की, इतके स्पष्टपणे सत्य सांगणे त्यावेळीच्या पुढाऱ्यांना आणि वर्तमानपत्रांना शक्य नव्हते. बहुतेकांची तसे सांगण्याची मानसिक प्रगती देखील झालेली नव्हती. त्यातील मोठमोठे लोक देखील इंग्रज राज्यच उलथवून पाडण्याच्या इच्छेसही अनिष्ट म्हणून हसत. त्याकाळात तात्यारावांनी हे सत्य उघडपणे सांगण्याचे धारिष्ट्य दाखवले होते.
--*--
*(c) आदित्य अनिल रुईकर Advocate*
*बखर_सावरकरांची:* भाग ४३ (१२/०७/२०२२)
*२०. इंग्रजांचा राजा म्हणजे हिंदुस्थानचा लुटेरा.*
या काळात इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया मरण पावली. त्यामुळे हिंदुस्थानभर शोक सभा होऊ लागल्या. काही लोकांमध्ये दुःख झालय अस दाखवण्याची चढाओढ लागली होती. प्रसिद्ध राष्ट्रीय वर्तमानपत्रात देखील अशी राजनिष्ठा दाखवली जात होती. अशा लोकांचे, वर्तमानपत्रांचे हे म्हणणेच असे की, ‘इंग्रजी राज्य हिंदुस्थानवर हवे की नको हा वादच नाही. राजाविरुद्ध, बादशहाविरुद्ध आमचे काही एक भांडण नसून आम्ही इंग्लंडच्या राजाची इंग्लिश लोकांइतकीच राजनिष्ठ प्रजा आहोत. आमचे भांडण केवळ त्यांच्या येथे असलेल्या वाईट अधिकाऱ्यांशी आणि पद्धतीशी आहे. ते अधिकारी बदलून दुसरे पाठवले तर आम्ही त्यांचा गौरवच करू. अशा विचारसरणीच्या लोकांना घरातीलच कोणी वारल्याचे दुःख झाले होते. इंग्लंडची राणी म्हणजे कोणी देवी असल्याच्या थाटात हे लोक तिची स्तुतीस्तोत्रे गात होते. आणि नवीन होणाऱ्या राजाच्या प्रती एकनिष्ठता दाखवण्यासाठी झटत होते.
मागे चापेकर बंधूंच्या प्रकरणात ज्यांच्यावर सरकारी लोकांचा रोष ओढवला गेला होता, त्यातील काही व्यक्ती आणि संस्था यावेळी आपण किती राजनिष्ठ आहोत हे दाखवत होते. ते राणीची आणि नव्या होणाऱ्या राजाची स्तुती करताना थकत नव्हते. आपली राजनिष्ठा व्यक्त करून आपल्यावरील सरकारच्या मागच्या कोपाचा उपमश करण्याची पराकाष्ठा करत होते. या सगळ्या धांदलीमध्ये मित्रमेळ्याचे प्रमुख म्हसकर आणि पागे यांनी आपल्यावरील पोलिसांचा डोळा चुकवण्यासाठी आपण देखील एक शोकसभा आयोजित करावी असे ठरवले. त्यामुळे नाशिकला मित्रमेळ्यात बरीच अस्वस्थता निर्माण झालेली होती. त्याच वेळी तात्याराव नाशिकास आले.
पोलिसांचे मित्रमेळावर लक्ष असण्याचे कारण म्हणजे मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठकींमध्ये होणाऱ्या स्वदेश स्वातंत्र्याच्या चर्चा, गणेशोत्सव आणि शिवोत्सव यांच्यात दिलेल्या भाषणांत आणि गायलेल्या काव्यांत संपूर्ण स्वातंत्र्याचा जयघोष होई, यामुळे पोलिसांना संशय येऊ लागला होता. त्यावेळच्या काळात अतिशय धाडसी असणारा तेजस्वी प्रचार मित्रमेळ्याच्या माध्यमातून तरुण करू लागले होते. त्यामुळे नाशिकचे तरुणच नव्हे तर प्रौढ लोकही या विचारांचे पाईक बनत चालले होते. मोठ्या पुढाऱ्यांचा गुप्त किंवा प्रकट पाठींबा मिळत चाललेला होता. तो पोलीस अधिकाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेस पडला नसता तरच नवल. त्यांनी मित्रमेळा या संस्थेस ‘भयंकर’ या मथळ्याखाली नोंदविले होते.
असे म्हणत की, मध्यरात्रीच्या अंधारात वाटेवरची सुई स्पष्टपणे दिसावी अशी तिखट आणि चौकस नजर या इंग्रज अधिकाऱ्यांची असे, त्यांच्या नजरेतून मित्रमेळा अधिक काळ वाचणे शक्य नव्हतेच. आणि या संस्थेवर सरकारी अधिकाऱ्यांचा डोळा असल्याची कुणकुण म्हसकर वगैरे सरकारी नोकरांना लागलेली होती. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आणि संस्थेच्या भल्यासाठी आपण राजनिष्ठेचे सोंग म्हणून का होईना पण राणीच्या निधनाची शोकसभा घ्यावी. म्हसकर तात्यारावांना हे यापूर्वी देखील अनेकदा सुचवत असत पण यावेळी मात्र त्यांनी तसा हट्टच धरला. त्यांच्या या प्रस्तावाला पागे वगैरे सगळ्या सरकारी नोकरांनी पाठींबा दिला. म्हसकर आणि पागेंना असे वाटत असे की, ‘मित्रमेळ्याचे दिवसेंदिवस अधिक कडक होत चाललेले क्रांतिकारक विचार आणि व्याप पाहून, या तरुणांना पायबंद घातलाच पाहिजे.’
काही सभासदांचे मन वळवून म्हसकर यांनी बैठकीत आपला बेत सांगितला की, “आपण ज्या अर्थी मित्रमेळ्याच्या वतीने गणेशोत्सव आणि शिवोत्सव आणि राजकीय चळवळीच्या सभा घेतो त्याअर्थी आपणही व्हिक्टोरिया राणी मेल्याची शोकसभा घेऊन राजनिष्ठा व्यक्त करायला हवी.”
तात्याराव या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी या प्रस्तावास तीव्र विरोध दर्शविला आणि ते म्हणाले,
“म्हसकर राजनिष्ठेचे सोंग म्हणूनच ही सभा करू म्हणत आहेत, त्यांच्या मनातून तेही आमच्यासारखेच इंग्रजांचा राजा हिंदुस्थानचा नाही, या मताचेच आहेत. त्यांच्या त्या मतात बदल झाला नाही ही आनंदाचीच गोष्ट आहे. तेव्हा ही सभा एक राजनीतीचा डाव म्हणून करावी की करू नये, एव्हढाच प्रश्न आहे.”
म्हसकर म्हणाले, “होय, राजनीतीचा डाव म्हणून का होईना अशी सभा आपण घेतलीच पाहिजे.”
त्यावर तात्याराव आपले बोलणे पूर्ण करत म्हणाले की, “राजनीतीचा डावही प्रसंगी खेळलाच पाहिजे. किंबहुना गुप्त संस्था म्हणजे एक राजनीतीचा डावच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळेवर औरंगजेबाला शरणागतीची खोटी पत्रे लिहिली. कृष्णही उघडपणे कंसाला मरावयाला जातो म्हणून मथुरेस आले नाहीत. तसे प्रसंगी आपणही राजनिष्ठेचे सोंग करू. पण आज तो प्रसंग आहे का?”
म्हसकर म्हणाले, “अर्थातच आहे, असे आम्हाला वाटते. शत्रूस फसवायचे असेल तर हे करावे लागेल.”
त्यावर तात्याराव म्हणाले,
*“जेव्हा आपण शत्रूस फसवण्यासाठी एखादी वरकरणी माया दाखवितो तेव्हा नेहमी हे पाहिले पाहिजे की, त्या फसवण्याच्या डावाने विपक्ष खरच फसतो, की आपणच काय ते फसतो. एकंदरीत त्या डावामुळे आपल्यापेक्षा विपक्षाची हानीच जास्त होण्याचा संभव असेल तर असे राजनिष्ठेचे शाब्दिक सोंग, छाप्याच्या आधीचे अफजलखानास दाखवलेले भीतीचे कापरे, समर्थनीय ठरेल. पण आपल्यावर तसा कोणताही प्रसंग गुदरलेला नाही.”*
*(c) आदित्य अनिल रुईकर Advocate*
*बखर_सावरकरांची:* भाग ४४ (१३/०७/२०२२)
म्हसकर हट्टालाच पेटलेले होते, त्यांना त्यांचा मुद्दा काही करून तात्यारावांना पटवायचाच होता. ते म्हणाले, “झाडून साऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी देखील राजनिष्ठा व्यक्त करण्यास ज्या लाटेत सापडून मागे पुढे पाहिले नाही, त्या लाटेची संधी साधून मित्रमेळ्याच्या वतीने एक दुःख प्रदर्शनार्थ सभा भरवावी आणि त्यातच नवीन राजे एडवर्ड यांच्याशी आम्ही राजनिष्ठ असल्याचा एक ठरावही करून टाकावा.”
त्यावर तात्याराव समजावण्याच्या सुरात म्हणाले, “राजनिष्ठेची ही सभा आणि व्हिक्टोरियाचा शोक करावयास इंग्रजी निर्बंधाप्रमाणे देखील आपण बांधलेले थोडेच आहोत. मग टाळता येणारे असूनही असे राष्ट्रीय पाप बळेच का करा? इंग्रजांना भर सभेत राजे म्हणायचे?”
म्हसकर म्हणाले, “पण व्हिक्टोरिया राणीने आपले व्यक्तिगत काय नुकसान केले आहे? ती व्यक्ती म्हणून तर चांगलीच होती. या अर्थाने आपण तिच्यासाठी शोकसभा घ्यायला काय हरकत आहे?”
तात्याराव आणि म्हसकर यांच्यातील सवाल-जवाब संपतच नव्हते. म्हसकर हरप्रकारे तात्यारावांना आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. आणि तात्याराव त्यावर योग्य तो आक्षेप नोंदवत होते. तात्याराव म्हणाले,
“जोवर भारतात त्यांचे बलात्कारी राज्य आहे, तोवर एका प्रचंड सशस्त्र दरवड्याहून त्याला नैतिक निष्ठेचा लवलेशही पाठींबा असू शकत नाही. ते राज्य करण्यात भाग घेणारा प्रत्येक इंग्रज चोर आहे आणि दंडनीय आहे. तो राजा असेल इंग्रजांचा, आमचा नव्हे. त्यांनी रडावे हवे तर. व्हिक्टोरिया व्यक्तीशः चांगली होती इतकेच म्हणून ठराव करावा असे म्हसकर म्हणतात. पण ती मेली त्या दिवशीच किती तरी अशा चांगल्या बायाबापड्या मेल्या. त्यांचा का नाही उल्लेख होत? हे सर्व ढोंग आहे. ती राणी होती म्हणूनच तुम्ही ही सभा करणार. ती आमची राणी नव्हतीच. उलट तिच्या कारकिर्दीत हिंदुस्थानचे प्रांतामागून प्रांत इंग्रजांनी गिळले, तिने गीळवले आणि थापेबाजीचे ते चिरोटे, तो ‘सत्तावनचा जाहीरनामा’ ज्याला दुधखुळे राजकारण ‘सनद’ म्हणते. ते प्रसिद्ध करून आपण त्या दुष्ट लुटीची राजरोस स्वामिनी बनली! एक कण तरी तिने परत दिला का? नेला कोहिनूरी राजमुकुट आणि मुळी म्हणून दिले ते जाहीरनाम्याचे चिरोटे! एवढी साध्वी होती तर सत्तावनच्या क्रांतीयुद्धात लाखो हिंदूंच्या रक्ताने भरलेला मुकुट तिने हसतहसत स्वतःच्या डोक्यावर का ठेविला? इंग्रजांच्या कोणत्या एखाद्या तरी राक्षसी नीतीला तिने दूषण दिले आहे का? इंग्रजांच्या दुष्टाईचे दायित्व तिच्यावर नाही म्हणाल. का तर ती बुद्धिबळातील राणी होती. तर मग सुष्टाईचे दायित्वही तिचे कसे? तेही बुद्धिबळ खेळणाऱ्याचे.”
पागे मधेच काही बोलणार इतक्यात तात्यारावांनी त्यांना थांबवून आपण आपले म्हणणे पुढे मांडू लागले की,
“त्याला त्याच्या घातकी डावपेचात त्या सनदेच्या वेळेस थोडा मायावीपणा दाखवल्यावाचून गत्यंतर नव्हते! तेव्हा राजा काय आणि राणी काय ती इंग्रजांची राणी म्हणजे आमच्या शत्रूची राणी. म्हणजे आमच्या या देशावर तुटून पडलेल्या दरवडेखोरांचा सरदार, मुख्य! त्याच्याशी म्हणे राजनिष्ठा व्यक्त करा! आणि तेही कोणी भाग पाडले नसताना. निरुपायाने अशी युक्ती राष्ट्रहितार्थ योजावी लगावी असा कोणाही प्रसंग समोर नसताना? उलट हीच वेळ आहे, मित्रमेळ्याचे वैशिष्ट्य दाखवण्याची. देशात अनेक जण राणी मोठी चांगली म्हणून राजनिष्ठेच्या निर्लज्य स्तुतीपाठात वाहवला असता आपण घरोघर जाऊन सांगू कसली राणी! कसली राजनिष्ठा! ही राजनिष्ठा नव्हे, ही गुलामगिरीची गीता आहे!”
म्हसकर म्हणाले, “आता अशी सभा घेतली म्हणजे नंतर राजकीय चळवळीत आपण वाट्टेल तितकी कडक भाषा वापरू शकू.”
पागे म्हसकर यांच्या म्हणण्याला संमत्ती दर्शवत म्हणाले की, “आता सभा घेऊन त्यांना दाखवून देऊ की, आमची राज्यपद्धती सुधारा इतकीच मागणी आहे. इंग्रज राज्य नकोच अशी मागणी नाहीच. असे स्पष्ट झाल्याने सरकारी संशयास आपल्या संस्थेला अकाली बळी पडावे लागणार नाही. संस्था पुष्कळ दिवस तगेल आणि उपयुक्त कामे करेल.”
म्हसकर, पागे आणि इतर काही मंडळी आपले म्हणणे सोडायला तयारच नव्हते. ते फिरून फिरून पुन्हा तेच ते म्हणणे मांडत होते. तात्यारावही त्यांच्या प्रत्येक म्हणण्यातील फोलपणा दाखवून देत होते. शोकसभेचे आयोजन करणे कसे अयोग्य आहे, हे दाखवून देत होते. तात्याराव पुढे म्हणाले,
“आमचा राजा आमचा देश! दुसरा राजाबिजा आम्ही जाणत नाही! अशाप्रकारे तेजस्वी सत्य सांगणारी एक तरी संस्था या प्रसंगी आहे हे सिद्ध करण्याचे, भविष्याच्या प्रतिवादीच्या मूर्तिमंत सूचना होण्याचे भाग्य ह्या आपल्या संस्थेला लाभत असेल. तर त्यास निष्कारण भेकडपणाने का अंतरावे! मोठे अगदी तोलूनतोलून लिहिणारे देशभक्तही इंग्रजांच्या मनात येताच तुरुंगात दडपले जातात की नाही! मग आता स्पष्ट काय ते बोलून टाकूया!”
म्हसकर पुन्हा म्हणाले, “पण अशांचे परिणाम किती वाईट असतात हे आपण सगळे जाणतोच की.”
तात्याराव त्यावर उसळून म्हणाले,
“स्वातंत्र्याचे तेजस्वी ध्येय आणि त्याचा दिव्य ध्वज अम्लान, अनवनत असा उघडपणे उभारू या! क्षणापुरता जरी तो आपण तोलू शकलो आणि दुसऱ्या क्षणी शत्रूच्या गोळीने ठार होऊन चितेत पडलो तरी चिंता नाही, कारण असे मेलेल्यांची चिता पेटताच तिच्या आगीने आग भडकते. आणि अशाच एखाद्या भडकलेल्या आगीचा वणवा होऊन परसत्तेचा राजवाडा त्यात जळून खाक होतो! अशा प्रयत्नास फाशीची शिक्षा असते म्हणून बजावता? ते आम्हास माहित आहे! चापेकरांच्या फाशीतून आम्ही जन्मलो, आमची फाशी आणखी कोणास जन्म देईल आणि हा वंश राखील. फार दिवस जगून पक्वकाली जे देशहित साधावयाचे ते हे लक्षावधी म्हातारेकोतारे, बायाबापडे जगून साधतच आहेत. आता अकाली मरणाऱ्यांचेच मारक मरण काय साधते ते पाहण्याचे उरले आहे. फाशीवर अकाली मरतात आणि या प्लेगात, दुष्काळात, महामारीत? प्राण की स्वातंत्र्य! हा प्रश्न आम्ही स्वतःसाठीच विचारून आणि स्वातंत्र्य! प्राण गेला तरी बेहत्तर पण स्वातंत्र्य! ही शपथ घेऊनच येथे पाय ठेवला नाही का?”
म्हसकर, “पण...”
म्हसकरांचे बोलणे थांबवत तात्याराव निर्वाणीचे बोलू लागले,
*“प्रस्तुतचे राष्ट्रीय पुढारी म्हणतात, आमचा राजाशी वाद नाही. पद्धत आणि अधिकारी तेवढे चांगले असले की झाले! त्यामुळे लाखो लोकांची खरोखर तशी भ्रामक समजूत होते. म्हणून आपण स्पष्टपणे घोषित करूया की, ‘नाही! राजाशी आमचा मुख्य वाद आहे. देवदूत जरी अधिकारी म्हणून धाडाल नि प्रत्यही जिलबी फुकट चाराल तरीही हे युद्ध आम्ही थांबवणार नाही, कारण आम्हास तुमचे राज्यच नको आहे. तुमचा राजेपणा नको आम्हाला. आम्हास स्वतःसच राजा व्हायचे आहे. आमचा देश हाच आमचा राजा! बाकी सगळे चोर!”*
तात्यारावांच्या स्पष्ट विचारांनी आणि त्यांच्या बोलण्याने बहुतांशी सर्व सभासदांना मित्रमेळ्याचा उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट झाला.
म्हसकर, पागेंसह सर्वांचे मनात किरकोळ असा असलेला किंतु देखील तात्यारावांच्या या बोलण्याने निघून गेला होता. त्यांनी आपला हट्ट सोडून दिला. मित्रमेळ्याने राजनिष्ठेची सभा भरवू नये, असे ठरले. पुढे हेही ठरले की, आपल्या अंगीकृत व्रताप्रमाणे शक्य तितक्या अंशी अशा सभांना आणि ठरावांना अडथळा करावा. मोठमोठे पुढारी जे बोलण्यास कचरत असत, ते अठरा वर्षांचा मुलगा अगदी स्पष्टपणे, उघडपणे बोलत असे. म्हसकर देखील याच विचारांचे पण या मुलांच्या क्रांतिकारी विचारांना थोडातरी पायबंद हवा आणि पोलिसांची नजर मित्रमेळ्यावर पडू नये म्हणून ते चिंतेत असत.
--*--
*(c) आदित्य अनिल रुईकर Advocate*
*बखर_सावरकरांची:* भाग ४५ (१४/०७/२०२२)
*२१. तात्यारावांची ज्ञानार्जनाची पद्धत.*
सन १९०१ साली तात्याराव सहावी इयत्ता उत्तीर्ण होऊन सातवीत गेले. यावेळी त्यांचे वय अठरा वर्षे होते. आधी पाचवीपर्यंत मराठी शाळा केली. नंतर पुन्हा पहिलीपासून इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. इतकच काय घरातील अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात खंडही पडत होता. शिवाय अधून मधून उद्भवणाऱ्या प्लेगची आडकाठी असेच. त्याकाळी सातवी हे मँट्रिकचे वर्ष असे.
यावर्षी अवांतर वाचनाचा मुख्य भर तात्यारावांनी इतिहासाच्या अभ्यासावर दिला. अकोडिया, असिरीस, बाबिलोन पासून ते तुर्की साम्राज्यापर्यंतचा इतिहास त्यांनी यावर्षी वाचून काढला. तात्याराव जे जे वाचत असत त्यातील महत्वाचे मुद्दे आणि उतारे ते एका वहीत लिहून ठेवत. त्यामुळे त्यांनी केलेले वाचन वरवर न ठरता ते कायमचे लक्षात राही. गरज लागेल तेव्हा त्या वहीतून उतारे वाचले म्हणजे तो संपूर्ण विषय डोळ्यापुढे उभा राही. अशा टिपणांचा उपयोग तात्यारावांना व्याख्यान देण्यासाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी चांगला होई.
वयाच्या बाराव्या वर्षीपासून तात्यारावांना ही सवय होती. त्यांना ती सवय आपसूकच लागली होती. त्यांनी त्यावेळी असे उतारे लिहून ठेवलेल्या वहीस जे नाव ठेवले होते, ते अतिशय समर्पक होते. ते अशा वह्यांना ‘सर्वसारसंग्रह’ असे म्हणत. तेच नाव त्यांनी बी.ए. पर्यंत चालू ठेवले. तोपर्यंत त्यांच्या या उताऱ्यांच्या चार पाच वह्या तरी भरल्या होत्या. पण पुढे क्रांतिकारक खटल्याच्या वावटळीत जे दिसले ते जाळून टाकण्याच्या धडाक्यात त्या वह्याही निरुपायाने जाळाव्या लागल्या.
तात्यारावांच्या वाचून पूर्ण केलेल्या ज्ञानास स्थायी, सुव्यवस्थित आणि सुसंगतपणा देण्यास या सर्वसारसंग्रह वहीचा फार उपयोग झाला. तसेच हे ज्ञान वाढविण्यासाठी मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठकी देखील फार उपयोगी असत. तात्याराव जे जे वाचत ते ते बैठकीत सगळ्यांना मोकळेपणे सांगत. त्यावेळी त्यांचा तो विषय अधिकच तयार होई. परिणामकारकरीत्या ते व्यक्त कसे करावे, दुसऱ्यास कसे पटवून द्यावे. ही कला त्यांनी बैठकीत विषय मांडत असताना आत्मसात केली. जे वाचून तात्याराव साप्ताहिक बैठकीत मांडत असत तो विषय त्यांचा आणि ऐकणाऱ्याच्या स्मृतीत कोरून ठेवल्या सारखा कायमचा राही.
यावर्षी तात्याराव तापाने आजारी होते. त्यात त्यांचा महिनाभर गेला. या काळात आणि प्रकृती सुधारानंतर विश्रांतीच्या काळात त्यांचा लहानपणीपासूनचा आवडीचा छंद म्हणजे मोरोपंतांच्या आर्या, यावर त्यांनी वाचन केले. त्यांनी हा काळ मोरोपंतांच्या विस्तृत आणि विवेचक अभ्यासात घालवला. काव्येतिहास आणि काव्यसंग्रह ते नियमित वाचत. तात्याराव जशी देशभक्तीची ओजस्वी व्याख्याने देत, तसेच अलंकार शास्त्रावर आणि मोरोपंतांच्या अर्यांवरही व्याख्याने देत. असे गोड विषय रंगवण्यात त्यांना मनापासून आनंद वाटे.
या तात्यारावांच्या ज्ञानार्जनास त्यांची आणखीन एक सवय उपयोगी ठरली. ती म्हणजे, प्रत्येक वर्षी वाचलेल्या पुस्तकांच्या नावांची यादी ते करून ठेवत असत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी त्यांची संख्या अधिक असेल याकडे ते काळजीपूर्वक लक्ष देत असत. नाशिकच्या नगर वाचनालयातील मराठी पुस्तके तात्यारावांनी जवळजवळ अनुक्रमे पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढली होती. जी पुस्तके किंवा पुस्तकातील काही भाग समजला नाही तर ते तो भाग पुन्हा पुन्हा वाचून काढत. जे समजेल तोच भाग आत्मसात करत. मित्रमेळ्याच्या सभासदांची ज्ञान वाढ ही तात्यारावांच्या ज्ञान वाढीवर बहुतांशी अवलंबून असल्याने, ते नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्याची दक्षता घेत.
वाचलेल्या ग्रंथांच्या सारांशाने आणि उताऱ्यांनी भरलेला तात्यारावांचा सर्वसारसंग्रह, तात्यारावांच्या आन्हीकी (डायऱ्या), त्यांनी आखलेली वेळापत्रके, वर्षाकाठी वाचलेल्या पुस्तकांच्या टिप्पणी इत्यादी प्रकारच्या व्यवस्थितपणाच्या सवयीमुळे तात्यारावांच्या बौद्धिक, मानसिक आणि व्यावहारिक कर्तुत्वाचा व्याप तर वाढलाच त्याशिवाय त्यात टापटीप, चिकाटी आणि सुसंगतता येण्यासही त्यांना फार सहाय्य झाले. आणि तात्यारावांचे हे वळण बघत त्यांच्या अनेक मित्रांनी देखील ही सवय आत्मसात केली.
मित्रमेळ्याच्या सभासदांचे ज्ञान वाढावे आणि प्रत्येकास राज्यक्रांतीच्या ज्या महान कार्यास वाहून घ्यावयाचे होते, त्याकरिता लागणारी बौद्धिक योग्यता आणि सिद्धता काही प्रमाणात तरी सर्व सभासदांत यावी यासाठी प्रत्येक सभासदांनी वाचलीस पाहिजेत अशी वीस पंचवीस पुस्तके निवडण्यात आलेली होती. त्यात जगातील राज्यक्रांत्यांची पुस्तके, जगत्विरांची चरित्रे, भारतीय इतिहास, व्यायाम पुस्तके, आणि विवेकानंद व रामतीर्थ यांचे एक दोन वेदांत ग्रंथही या यादीत समाविष्ट करण्यात आलेले होते. इतकी पुस्तके तर प्रत्येक सभासदांस वाचावीच लागत. शिवाय दातारांच्या विष्णूच्या मंदिरात मित्रमेळाने एक नि:शुल्क वाचनालय देखील सुरु केले होते.
--*--
*(c) आदित्य अनिल रुईकर Advocate*