गौराई
मला हा सण अतिशय आवडतो. गौरी आल्यापासून ते जाईपर्यंत म्हणजे आज, उद्या आणि परवा, असे तीन्ही दिवस मोठे धामधूमीचे, उत्साहाचे आणि आनंदाचे असतात...
प्रत्येक जातीजमातीची गौर निराळी, म्हणजे बसवण्याची आणि पूजेची पध्दत निराळी असते. पण तत्व एकच असते...ते म्हणजे पावसामुळे सुजलाम् सुफलाम् झालेल्या धरित्रीचे ऐश्वर्य- समृध्दी साजरे करणे.
या उत्सवाशी जोडलेल्या विपूल लोककथा
सा-या जगभर सांगितल्या जातात.
कंबोडियामध्ये आपला गौराईचा उत्सव, माणसाच्या पृथ्वीवरील आगमनाचे प्रतिक म्हणून साजरा होतो. तिथल्या एका लोककथेत, अनुराधा नक्षत्रावर म्हणे देव, एक पुरुष आणि एका स्त्रीला घेऊन पृथ्वीवर आले. ज्येष्ठा नक्षत्रावर देवांनी इथला पाहुणचार घेतला आणि त्या बरोबय आणलेल्या स्त्री पुरुषांना, पृथ्वीवरच ठेवून, ते देव मूळ नक्षत्रावर स्वस्थानी परत गेले. ही तीन्ही नक्षत्रे, वृश्चिक राशीसमूहातील आहेत. अनेक पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर माणूस हा वृश्चिक राशी समूहातल्या कोणत्या तरी ग्रहावरून आलेला आहे. हा शोध अर्थातच अलिकडचा आहे. पण कंबोडियामध्ये कितीतरी वर्षांपासून हा सण, साजरा केला जातो.
आपल्याकडच्या एका कथेत, कैलासावर तेच तेच खाऊन गणोबांना कंटाळा आला होता. उंदीरमामांकडून त्यांना माणसांच्या पाककौशल्याबाबत कळले. तेव्हापासून ते, पीक पाणी चांगले झालेले असते, अशा दिवसात पृथ्वीवरच्या माणसांकडे चांगले पाच दिवस मुक्काम ठोकून पाहुणचार घ्यायला लागले.
कैलासावर, गणपतीबाप्पा गाणी गाऊन, नाच करून दाखवत असत. पार्वतीमातेला काही त्या गुणी लेकराशिवाय करमेना, म्हणून दोन दिवसांनी ती त्याला परत घरी न्यायला येते आणि तिच्या मागोमाग गणोबांचे तात शंकरोबाही येतात.... या कथेमध्ये पार्वती आई, गणेशाला, हवे ते आणि हवे तितके खायला देईन, असेही सांगत असते. हे तुमच्या आमच्यासारखेच कुटुंब आहे. ज्याची पूजा होते.
काही कथांमध्ये ही गौरी हे पृथ्वीचे रुप आहे आणि शंकरोबा, हे नांगराचे प्रतिक आहे... त्यांची अपत्ये म्हणजे ज्ञानरूपी आरंभकर्ता श्रीगणेश आणि शौर्य रुपी रक्षणकर्ता कार्तिकेय. अनेक ठिकाणी या चौघांचीही पूजा करण्याची पध्दत असते.
आपल्या इथे गौरीपूजनासाठी तेरड्याची फूलांसकट झाडे आणली जातात. तसेच नेपाळ, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम, कोरिया, पेरु...या देशातल्या आदीम जमातीही याच दिवसात 'आदिशक्तीचे पूजन' म्हणून तेरड्याच्या झाडांचीच पूजा करतात. अर्थातच त्या पूजेचे स्वरुप वेगळे आहे. भारताबाहेरील अनेक ठिकाणी वाळवलेल्या गौरीच्या बिया आणि खोडे यांचा वापर करून पुडिंग बनवले जाते. आपण पाडव्याला कडूलिंबाची जेवढी चटणी खातो, तेवढ्याच प्रमाणात ते खातात. पावसाळ्यात, तर तेरड्याचे महत्व फार आहे. सर्पदंश, संधीवात, फ्रॅक्चर भरून येण्यासाठीही त्याचा उपयोग असतो. गौरीची झाडे अंगणात असली, तर उंदीर, घूशी सदृश प्राण्यांची प्रजनन शक्ती कमी होते. तेरड्याच्या फळांच्या बिया खाल्ल्या की माणसांचे औदासिन्य पळून जाते. झोप यायला लागते. तेरड्याच्या बियांचा उपयोग, दूष्काळात भूक भागविण्यासाठीही होतो. तेरड्याच्या झाडाला गौरीचे झाड असेही संबोधले जाते. गौरीचे संपूर्ण झाड पाण्यात उकळवून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांचे आरोग्य आणि वाढ सुधारते. चायनिज हर्बल मेडिसिनमध्ये गौरीचा उपयोग, मधूमेहात वाढलेली शुगर कमी करण्यासाठी होतो.
तेरड्याच्या फूलांच्या अर्कातून काढलेला रंग अगदी दोन तीन दिवसच टिकतो. तो अधिक दिवस टिकण्यासाठी त्यात तूरटी मिसळतात. मग तो रंग कापड विशेषत: लोकर रंगवण्यासाठी वापरतात. या झाडाचा उपयोग जमिनीची प्रत सुधारण्यासाठीही होतो. एवढे बहुगुणी झाड... पूर्वी केवळ पावसाळ्यातच उगवत असे आणि भाद्रपद संपत आला की झाडाचेही आयुष्य संपे, त्यामुळे...तेरड्याचे हे असे कौतुक... तेरड्याबरोबर अनेक ठिकाणी कळलावी, या वनस्पतीला गौरीचे हात म्हणून वापरतात. या कळलावीचाही उपयोग सर्प आणि विंचू दंशावर होतो. टायफॉइड, गंडमाळा यावरही या वनस्पतीच्या मूळांचा काढा उपयुक्त आहे. शारीरिक आणि मानसिक दौर्बल्यासाठी या कळलावीच्या फूलांचा अर्क काढून खोबरेल तेलात मिसळतात आणि त्याचा अंगभर मसाज करतात. कळलावीच्या फूलांच्या चूर्णाचा उपयोग सुलभ प्रसूतीसाठी होतो. विशेषत: स्नायूंच्या आजारांवर ही वनस्पती फारच उपयोगी असते. तिसरी वनस्पती असते ती म्हणजे आघाडा. आघाड्याची भाजी, चटणी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कफ आणि वात विकारांवर उपयोगी असते. दातदूखी, रातांधळेपणा, काविळ यांसारख्या रोगांवरही आघाड्याचा उपयोग होतो.
'शंकरोबा' म्हणून पूजली जाणारी पांढ-या देवचाफ्याची हिरवी पाने...या पानांनी शेकल्यास सूज कमी होते. हा देवचाफा, प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतो. भारताच्या दक्षिणेकडील राज्यातल्या अनेक ठिकाणी नवरा-नवरी लग्नामध्ये चाफ्याच्या फूलांच्या माळा एकमेकांना घालतात, ते यासाठीच. काही ठिकाणी शंकरोबाचे गण म्हणून छोटया पांढ-या फूलांची झाडे, असतात, त्याची पाने, खरे तर ती संपूर्ण झाडेच, पावसाळ्यात उद्भवणा-या, चिखल्या, करट, नारू अशा रोगांवर, उपयुक्त असतात. यावेळी दूर्वाही असतात. दूर्वांचा उपयोगही त्वचारोग, मूत्राशयाचे व गर्भाशयाचे आजार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढावे यासाठी होतो.
पूर्वी लोकांना पावसाळ्यात घराबाहेर पडणे शक्य होत नसणार, गौरी पूजनाच्या निमित्ताने या पाच, सहा वनस्पती जरी घरात ठेवल्या तरी पावसाळ्यातले आरोग्य राखण्यासाठी चांगलीच मदतच होत असणार.
या वनस्पती ओळखता याव्यात, त्यांची साठवण आणि संरक्षण करावे या हेतूनेही खरे तर अनेक ठिकाणी गौरीचा सण साजरा केला जातो. आजही दूर डोंगराळ भागातल्या गावात, विहीर किंवा ओढ्यावरून गौर म्हणून पाच/ सात किंवा अकरा खडे आणतात. त्याबरोबर तेरड्याची झाडे आणतात. काही ठिकाणी त्यातला एक खडा. म्हणजे गौरीला माहेरी आणायला गेलेला भाऊ असतो. त्यातला एक मोठा दगड म्हणजे शंकरोबाही असतो.
आल्या दिवशी तिला घरात रांधलेलेच खायला घालतात. (तसे खडे आणि झाडे तर शहरातही आणतात, पण आल्या दिवशी भाजी, भाकरी, थापटवड्या, कढी, वाटाणेभात आणि सांज्याच्या वड्यांचे सांग्रसंगीत जेवण करतात)
दुसऱ्या दिवशी त्या गौराईचा नैवेद्य म्हणजे ज्वारीची आंबिल आणि फणसाच्या किंवा हळदीच्या पानातले पातोळे एवढाच असतो. काकडी, रानमूग आणि हरभरे यांची ओटी असते. त्याच रात्री बारा वाजता शंकरोबा येतो. शंकरोबा आल्यानंतर गणोबा, गौरी आणि महादेव यांना एकत्र ओवाळतात, त्यांना लाडू, खायला घालतात. तिसऱ्या दिवशी त्यांची बोळवण करताना मुरड कानवले आणि हरभ-याच्या डाळीचे तळण करतात.
नागरी संस्कृतीमध्ये मात्र गौरीपूजा, ही तंत्र पूजा बनते. तंत्रपूजा म्हणजे काय, तर आमच्याकडे पुरेसे आहे पण अधिक हवे आहे, मग ते धान्य असो की ऐश्वर्य, आरोग्य आणिअधिक प्रजा...काहीही.. यासाठी केलेली ती पूजा..
ती मंत्रसिध्द असते. तिला विशिष्ट प्रकारचे नैवेद्य आवश्यक असतात. सोळा भाज्या, पंचपक्वान्ने, तळलेले पदार्थ, हरभ-याच्या डाळींचे विविध प्रकार.. भोपळ्याचे पदार्थ...आणि आंबिलही असते. अशावेळी महादेवाच्या गौरीच्या ऐवजी महालक्ष्मीची पूजा होते. महालक्ष्मी दोन रूपात येते...एक म्हणजे लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे अलक्ष्मी...त्यांची मुले, म्हणजे दंभ आणि मुलगी म्हणजे मोहमाया... महालक्ष्मीची पूजा करणे सोपे नाही. तिला अस्वच्छता आणि आळशीपणा दोन्हीही मान्य नाही. उद्यमशील माणसे तिला आवडतात. पण तिला संपत्तीची साठवणूकही नको असते. दान दिल्याने समृध्दी येईल, असे असल्यामुळे महालक्ष्मीच्या सणाच्या वेळी भोजनासह इतरही यथाशक्ती दानधर्म केल्यास तिच्या पूजेचे अधिक फळ मिळते. महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तिची बहिण अलक्ष्मी आणि तिची मुले यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, खरे तर ते आपल्यावर स्वार होऊ नयेत म्हणून त्यांचीही पूजा करण्याची पध्दत आहे. महालक्ष्मीला उत्तमोत्तम खानपान, सजणे आणि सजवणे, दोन्हीही प्रिय आहे. त्यामुळेच तिची पूजा ही नेहमीच धूमधडाक्यात केली जाते. थोडक्यात गौरीची पूजा ही मातृस्वरुपाची आणि महालक्ष्मीची पूजा ही विश्वातल्या क्रयशक्तीची पूजा असते.
या दोन्ही पूजेच्या वेळी घागरी फुंकणे, हे प्राण आणि उर्जा फूंकण्याचे ही प्रतिक आहे. पावसामुळे आलेले औदासिन्य झटकून कामाला लागावे यासाठीची ती नांदी आहे.
फेर धरणे, फूगड्या, झिम्मा आदि खेळ हे वरवर पाहता स्त्रियांच्या सासर माहेराशी निगडित आहेत असे वाटले तरी खरे तर ते आपल्या जीवनचक्राशी संबंधित आहेत...थोडा विचार केला की जाणवतं..हे असे उत्सव म्हणजे विश्व उर्जेच्या विविध रूपांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या साठीच आहेत. खरोखरच आपल्या पूर्वजांचे कौतुक वाटते, असे वाटते कसा आणि कधी केला असेल एवढा विचार. त्याचबरोबर 'तो विचार.'..दळणवळणाची काहीही साधने नसताना अवघ्या विश्वात कसा पसरवला...असेल... खरेच त्यांच्यापुढे. नतमस्तक व्हायला होते.
काही वर्षांपूर्वी, मी इको टुरिझमवर अभ्यासक्रम तयार करण्याच्या निमित्ताने, एम टीडीसींच्या अधिका-यांच्या बैठकांना उपस्थित रहात असे. रत्नागिरीच्या एका पाटकर नावाच्या अधिका-याने " फेस्टिव्हल टुरिझम" अशी संकल्पना परदेशी पर्यटकांसाठी राबवलेली होती. (काही वर्षांनंतर, त्या सद्गृहस्थांनी एमटीडीसी सोडल्यानंतर ती संकल्पना परत कोणी राबवल्याचे मल माहिती नाही ) त्यामध्ये त्यांनी गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि होळी या उत्सवाची मोठी जाहिरात करून त्या सणांच्या वेळी गुहागर आणि आसपासच्या गावातल्या इच्छूक घरांमध्ये परदेशी पाहुणे पाठवलेले होते.
त्यावेळी तिथल्या एका आरे गावातल्या गौरीच्या उत्सवासाठी मीही गेले होते...
पाहूण्यांना गणेशोत्सव, गौराई पूजा खूप आवडले. प्रत्येक संकल्पनेचे आणि प्रतिकांचे अर्थ समजून घेतले..त्यांनीही काहींचे शअर्थ लावले.
पाण्यातूनच जीवन निर्माण झालेले असल्यामुळेच पाण्यातून विषम संख्येचे खडे आणायचे...ते खडे विषम संख्येचे असले पाहिजेत...कारण...सृष्टीतील विषमता...आणि विषमतेमध्येच सर्जनशक्तीही जन्म घेते. झाडे...हे विश्वाच्या सृजनाचे प्रतिक म्हणून त्यांची, रस, रंग, गंध, रूप आणि स्पर्श या पाच तन्मात्रांच्या सहाय्याने केलेली पूजा... हे सगळे अर्थ त्यांनाही उमगले... त्यात एक बरेच वयस्कर असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. ते प्रथमच भारतात आलेले होते..ते उभ्या महालक्ष्म्या असलेल्या एका घरी राहिले होते. त्यांनी त्यांच्या निरोपाच्या वेळी सांगितले, त्यांना हिंदू संस्कृतीतील सर्वात आवडले ते म्हणजे... आपल्याकडे सूष्टांबरोबर दूष्टांचीही पूजा केली जाते. त्या पूजेमध्ये जणू "सूसरबाई तुझी पाठ मऊ, "असे म्हणत त्या दूष्ट प्रवृत्तींना दूर ठेवण्याचीही खूबी सांगितली आहे, याचे त्यांना कौतुक वाटले. ...
त्यांचे भाषण संपले...तेव्हा आमचे सा-यांचे डोळे भरून आले होते..आपल्याजवळ काय आहे...ते दुस-यांनी दाखवल्याशिवाय आपल्याला कळत नाही हे खरेच....!
मंजूषा देशपांडे