१. सकाळी उशिरा उठल्याने आपण उठल्यावर इतर कुणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही दिवसाची खूपच सकारात्मक सुरुवात मानवी लागेल. आळसावलेली माणसे पाहण्यापेक्षा अंघोळ करून बसलेली फ्रेश माणसे आपल्याला आपल्या बेड मधूनच दिसायला लागतील.
२. चहासाठी दूध आणायला दुसरे कुणी आधीच जाऊन आलेले असल्यामुळे आपल्याला थेट चहाच हातात मिळेल. कदाचित बेड मधेच.
३. घरात आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या सकाळी उठून वाचण्याआधीच कुटुंबातील अन्य सदस्यांनी ते वर्तमानपत्र वाचून रद्दीत टाकले असेल. त्यामुळे वर्तमानपत्रातील नकारात्मक बातम्या वाचून दिवस (जो काही शिल्लक आहे तो ) खराब जाणार नाही.
४. दरम्यानच्या काळात टाकीतील पाणी संपले असेल तर अंघोळ करता येणार नाही. पर्यायाने आपल्या हातून पाण्याची बचत होण्याचे पुण्यकर्म मिळेल.
५. सकाळी लवकर न उठल्याने पहाटे फिरायला जाता येणार नाही. हे मोठं उपयुक्त ठरेल. कारण सांगतो. मागील आठवड्यात पहाटे जॉगिंग ला गेलेला एक मुलगा वाटेत कुत्रा पाहून अधिक जोराने पळाला, आणि व्हायचे तेच झाले. कुत्रा चावला. एका गृहस्थाला तर फिरायला गेलेले असताना मागून एकाने उडवले. हात फ्रॅक्चर झाला. एका महिलेची गळ्यातील चेन एका समाजकंटकाने चोरली. आपण घरीच सुरक्षित राहिलो कारण झोपलो होतो याचा कोण आनंद मला अशा बातम्या ऐकून मिळतो.
६. उशिरा उठल्यामुळे एकूणच स्वप्ने जास्त पडतात. स्वप्ने पहा आणि मोठे व्हा, हे कुणीतरी म्हणाले होते. याचा अर्थ त्यांना कळणार नाही जे घाईघाईने पहाटे उठतात. स्वप्ने पाहिली तरच जीवनात काही करू शकू. स्वप्ने न पाहणे हा मोठा प्रमाद मनाला पाहिजे. कारण मोठी कामे करण्यासाठी तशी स्वप्ने पाहणे आवश्यक असते. ती न पाहणे हा वैयक्तिक आणि समाजाचा मोठा तोटा आहे. म्हणून जास्त वेळ झोपून राहा.
७. खूप पहाटे उठणारी मंडळी विजेचे विनाकारण नुकसान करतात. तेच जर आपण आठ वाजता उठलो तर थेट सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपण आपली कामे करू शकतो. विजेचे मोठे संकट अधिक गडद करणारी हि पहाटे उठणारी मंडळी काय पाप करतायेत हे त्यांनाच माहित नाही. असो.
८. उशिरा उठणे आणि तब्बेतीवरचे परिणाम हा मोठा चर्चेचा विषय आहे. उशिरा उठल्याने बी.पी. , शुगर, लठ्ठपणा, हृदयविकार होऊ शकतात. मला हेच तर सांगायचे आहे. अशी मोठी संख्या देशाच्या आर्थिक प्रगतीस चालना देतात. कारण वैद्यकीय क्षेत्र, फार्मसी यांच्या कामातून राष्ट्रनिर्माण शक्य आहे. पैसा खेळतो माहितीये का. अक्षरक्ष: पैसे असे वाहतात. लोक इस्पितळात , दवाखान्यात जाऊन मोठे योगदान देतात, ही बाजू कुणी पहिली आहे का. त्यासाठी उशिरा उठून पहा. सतत उशिरा उठा. तुम्ही आजारी पडणे हे डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्राच्या हिताचे आहे. एवढेच नाही तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. पैसे साठविणे हे वर्ज्य आहे हे संस्कृत श्लोकात कुठं तरी कुणीतरी म्हणून ठेवले आहे.
९. पहाटे लवकर उठून योग्य, व्यायाम करणारी मंडळी चहा ऐवजी दूध पितात. आक्खा ग्लास दूध. हे दूध कुणाचे माहितीये ? गायी, म्हशीचे. ते खरे तर गायीच्या, म्हशीच्या पिल्लाना, वासरांना मिळणार होते. ते आता आपली ही माणसे पितात आणि केवढे कुकर्म करतात. उशिरा उठणारी माणसे चहा पितात. त्यात तुलनेने कमी दूध लागते. तुलनेने कमी पाप लागते.
मित्रांनो लिहायला गेलो तर खूप आहे हो. पण जाऊदे.
उशिरा उठण्याचे फायदे या विषयावरील माझे पुस्तक लवकरच येणार आहे. जरा उशिरा उठतोय म्हणून जरा लेट झालेय. त्यातही तुमचा फायदा आहे. जितके हे पुस्तक उशिरा येईल तितका तुमचा ते विकत घेण्याचा खर्च पुढे ढकलला जाईल.